शिराळा:निगडी (ता.शिराळा)येथील अशोक आबा आढाव यांच्या शेतातील वस्तीवरील घरालागत असणाऱ्या जनावराच्या गोठ्यास शॉर्ट सर्किटने लागलेल्या आगीत शेडसह चारा,खत व शेती अवजारे जळून खाक झाली.यामुळे सुमारे एक लाखाहून अधिक नुकसान झाले आहे.प्रसंगावधान राखून गोठ्यातील म्हैस बाहेर काढल्याने जीवितहानी टळली.सदर घटना आज शनिवार (ता.३)रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास घडली.
याबाबत घटनास्थळावरून समजलेली माहिती अशी की, अशोक आढाव यांचे आकराचे टेक येथे शेतामध्ये घर आहे.घरा लागत जनावरांचे शेड आहे.दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास किरण आढाव यांना आकराचे टेक येथे अशोक आढाव यांच्या शेतातील वस्तीकडे आग लागल्याचे दिसले.त्यावेळी त्याने ही माहिती अशोक यांच्यासह इतरांना सांगितली.अशोक आढाव ,किरण आढाव यांच्यासह इतर नागरिकांनी शेडकडे धाव घेतली. त्यावेळी अशोक आढाव यांनी गोठ्यात असणारी म्हैस बाहेर काढल्याने तिचा जीव वाचला.
मात्र दुपारची वेळ असल्याने कडक ऊन,वाऱ्याचा प्रचंड असणारा झोत व जवळपास पाण्याची सोय नसल्याने आग विझविणे शक्य झाले नाही.यामुळे जास्त नुकसान झाले.या आगीत शेड,एक हजार गवताची गंजी,पाचशे पेंढ्या शाळवाचा कडबा,३० पीव्हीसी पाईप,दोन ट्रॉली खत, शेती औजारे जळून खाक झाले. या आगीने रौद्ररूप धारण केल्याने शेड परिसारत असणाऱ्या गवताने पेट घेतल्याने त्या परिसरातील सुमारे तीन एकर क्षेत्रातील गवत जळून खाक झाले आहे.चार तासानंतर ऊन व वाऱ्याचा झोत कमी झाल्याने शेतकऱ्यांनी जाऊन तीन एकरा पुढील जळणारे क्षेत्रा मधील आग विझवल्याने पुढील क्षेत्र वाचवले.
घटनास्थळी सरपंच गणपती भालेकर,उपसरपंच सचिन गलुगडे,तलाठी नीलिमा परमने,सदस्य वसंत भालेकर,आकाश मदने,धनाजी सावंत,सुधीर आढाव,मयुरेश भालेकर,प्रवीण आढाव,सागर आढाव,किरण आढाव,उमेश भालेकर आदींनी भेट देऊन पंचनामा केला.
0 Comments