शिराळा : मांगले( ता.शिराळा ) येथील श्री शिवाजी सार्वजनिक वाचनाल्याचे ग्रंथपाल भगवान पांडुरंग शेवडे यांना पुणे विभागातून महाराष्ट्र शासनाचा डॉ.एस.आर.रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय सेवक ग्रंथमित्र पुरस्कार जाहीर झाला आहे .पंचवीस हजार रुपये व सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे .
श्री शेवडे गेल्या ३० वर्षापासून श्री शिवाजी सार्वजनिक वाचनालयात ग्रंथपाल म्हणून काम करीत आहेत .तालुक्यात ग्रंथालय चळवळ वाढावी यासाठी नवीन ग्रंथालये स्थापन करण्यासाठी अनेकांना मार्गदर्शन केले आहे .काही जुन्या बंद अवस्थेत असणा-या ग्रंथालयांचे दप्तर अद्यावत करून ती ग्रंथालये पुन्हा नव्याने सुरु केली आहेत .मोफत सर्वरोग निदान शिबीर,शेतीविषयक चाचासात्रे महिलांच्यासाठी स्वतंत्र ग्रंथ प्रदर्शन घेण्यात त्यांचा सहभाग आहे . गेल्या २८ वर्षापासून शिवाजी व्याख्यानमालेच्या माध्यमातून प्रबोधनाचा जागर सुरू ठेवला आहे. वाचनालयात प्रामाणिकपणे काम केल्याची पोचपावती म्हणून सन १९७९ - ९८ सालचा सहकार महर्षी तात्यासाहेब कोरे आदर्श ग्रंथपाल पुरस्कार त्यांना मिळाला आहे .पुणे विभाग ग्रंथालय संघाच्या वतीने देण्यात येणारा आदर्श ग्रंथालय पुरस्कार त्यांना साहित्यिक लक्ष्मीकांत देशमुख यांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले आहे . वाचनालयाला महाराष्ट्र शासनाचे सन १९९६-९७ आणि सन २०१३- १४ सालात डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट ग्रंथालयाचा पुरस्कार मिळाले आहेत . सहकार महर्षी तात्यासाहेब कोरे आदर्श ग्रंथालय म्हणून दोन वेळा सन्मान झाला आहे. दैनिक सकाळ मध्ये वीस वर्षे तर काही काळ महाराष्ट्र मध्ये पत्रकार म्हणून काम केले आहे. या माध्यमातून ग्रंथालयाविषयी लेख, बातम्या , सामाजिक प्रश्नाबाबत लिखाण केले आहे. पत्रकारितेतील कामाची दखल घेऊन अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न सांगली जिल्हा मराठी पत्रकार संघाने आदर्श पत्रकार म्हणून गौरवले आहे. महाराष्ट्र जर्नालिस्ट फाउंडेशनच्या वतीने कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरवण्यात करण्यात आले आहे.ऐतवडे खूर्द ता.वाळवा येथील सहकार महर्षी बाजीराव बाळाजी पाटील उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार देऊनही गौरविण्यात आले आहे . त्यांच्या पुरस्कारासाठी श्री शिवाजी सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष सर्व संचालक कर्मचारी यांचे पाठबळ मिळाले आहे.
0 Comments