शिराळा,ता.९:अनेक नाग मंडळानी इतर खर्चाला फाटा देऊन सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे.त्यामध्ये नागपंचमी बाबत विस्तृत माहिती देणारा सुब्रमण्यम समितीचा अहवाल मिरवणूकीचे आकर्षण ठरला.शिराळा येथे येणाऱ्या हजारो पर्यटकांनी व भाविकांनी शिराळा येथे कृषी उत्पन्न बाजार समिती व बस स्थानकसमोर समोर असणाऱ्या नागपंचमीचे ३२ शिराळा या सेल्फी पॉईंटवर गर्दी करून हजारो कॅमेऱ्याद्वारे नागपंचमीचा ३२ शिराळ्यासह स्वतःला मोबाईल मध्ये कैद केले.
शिराळची जिवंत नागपूजेची आगळी वेगळी असणारी परंपरा निसर्गप्रेमीनी दाखल केलेल्या याचिकेमुळे २००२पासून कायद्याच्या कचाट्यात अडकली आहे.या संदर्भात २०१४ साली तत्कालीन केंद्रसरकारने वन्यजीव अधिनियम १९७२ मध्ये व्यापक सुधारणा करण्याच्या उद्देशाने २९ ऑगस्ट २०१४ रोजी निवृत्त कॅबिनेट सचिव टी.एस.आर.सुब्रमण्यम यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली होती.२९ नोव्हेंबर २०१४ रोजी या समितीने तत्कालीन पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांच्या सूचनेनुसार नागपंचमी उत्सवादरम्यान जिवंत नागपुजेस परवानगी देण्याच्या अनुषंगाने कायद्यात आवश्यक ते बदल करण्याची महत्वपूर्ण शिफारस केली होती.परंतु त्यानंतर सदर शिफारशीचा अभ्यास करण्यासाठी स्थापन केलेल्या संयुक्त संसदीय समितीने सुब्रमण्य समितीच्या सर्व शिफारशी फेटाळून लावल्या.कारण सुब्रमण्य समितीने अत्यंत अल्प कालावधीत घाईघाईने आपला अहवाल सादर केला असे या संसदिय समितीचे म्हणणे होते.तेव्हापासून नागप्रेमी शिराळकर सातत्याने सुब्रमण्यम समितीच्या शिफारशीनुसार फक्त बत्तीस शिराळ्याच्या नागपंचमी उत्सवासाठी नाग पकडण्यास परवानगी देण्याच्या अनुषंगाने कायद्यात आवश्यक ते बदल करण्याची मागणी करत आहेत.येथील उबाळे गल्ली नागराज मंडळाने यावर्षीपासून नागपंचमी उत्सव पूर्णपणे पारंपरिक पद्धतीने साजरा करण्याचा एकमताने निर्णय घेतला.त्यासाठी त्यांनी डॉल्बी,नृत्यांगना,गुलाल व बॅनर बाजी या गोष्टींना पूर्णपणे फाटा दिला.त्याऐवजी पारंपरिक वाद्य व पारंपरिक वेशभूषा यांच्या साहाय्याने त्यांनी मिरवणूक काढली.नागपंचमी उत्सवाचे प्राचीनत्व सिद्ध करणारे ऐतिहासिक पुराव्यांचे सुब्रमण्यम समितीचा अहवालाचे बॅनर मंडळाच्या ठिकाणी व मिरवणूकिमधील वाहनावरती लावले होते.त्यामध्ये विशेष लक्ष वेधून घेत होते. या अहवालनुसार परंपरेनुसार जिवंत नागपुजेस परवानगी देण्याचे आवाहन शासनास करण्यात आले आहे.
कायद्यातील संभाव्य बदलाच्या अनुषंगाने आवश्यक तो मसुदा मंडळामार्फत तयार करण्याचे काम लवकरच सुरु करणार असून तो आवश्यक त्या यंत्रणासमोर यथावकाश सादर करण्यात येईल. या कामी सर्व नागप्रेमीनी सहकार्य करण्याचे आवाहन मंडळामार्फत करण्यात आले आहे.
0 Comments