शिराळा,ता.७:राज्यामध्ये डोंगरी भागाची संकल्पना विधानपरिषदेचे माजी सभापती स्वर्गीय शिवाजीराव देशमुख यांनी पहिल्यांदा मांडली. यामध्ये संपूर्ण शिराळा तालुका डोंगरी तालुका म्हणून घोषीत झाला. त्याच पद्धतीने शिराळा विधानसभा मतदारसंघातील वाळवा तालुक्यातील ४८ गावांचा डोंगरी उपगट निर्माण करावा. जेणेकरून या विभागातील लोकांना याचा फायदा होईल अशी मागणी आमदार सत्यजित देशमुख यांनी विधिमंडळात केली.
अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्यपालांच्या अभिभाषणावर आमदार सत्यजित देशमुख यांनी आपली भूमिका मांडली. यावेळी देशमुख यांनी शिराळा मतदार संघातील अनेक प्रश्न त्यांनी उपस्थित केले.यावेळी आमदार देशमुख म्हणाले, छत्रपती संभाजी महाराज यांचे गौरवशाली व्यक्तिमत्वा बाबत राज्यपाल यांनी आपल्या भाषणामध्ये गौरव केला आहे. छत्रपती संभाजी महाराज यांना वाचविण्याचा शेवटचा प्रयत्न शिराळा येथील भुईकोट किल्ला येथे झाला. याठिकाणी छत्रपती संभाजी महाराज यांचे भव्य दिव्य स्मारक व्हावे अशी मागणी आम्ही केली आहे. या कामासाठी निधीस मंजुरी देखील झाली आहे. हे काम गतीने व्हावे. त्याचबरोबर संगमनेर नायरी, येथील भागाचा विकास व्हावा.
विधानसभा मतदारसंघांमध्ये असणाऱ्या ४८ गावे ही शिराळा तालुक्यास लागून आहेत.शिराळा तालुका हा संपूर्ण डोंगरी तालुका आहे .त्याच पद्धतीने वाळवा तालुक्यातील ४८ गावांचा देखील डोंगरी उपगट म्हणून निर्मिती व्हावी. याबाबत शासनाने तातडीने निर्णय घ्यावा. पर्यटनाच्या दृष्टीने चांदोली अभयारण्य, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प,कोयना व आंबा या ठिकाणी वन पर्यटन चा दर्जा देऊन त्याबाबतचे नियोजन करावे. मुख्यमंत्री कौशल्य विकास योजनेअंतर्गत सुशिक्षित बेरोजगारांना मिळालेल्या नोकरी मुदतवाढ देण्याबाबत शासनाने विचार करावा. राज्य शासनाने रेशीम उद्योगास प्रगती व प्रोत्साहन देण्याबाबतचा सकारात्मक निर्णय घेतला आहे. शासनाने पायलट प्रोजेक्ट जालना जिल्ह्यामध्ये केला आहे त्याच पद्धतीने पायलट प्रोजेक्ट शिराळा तालुक्यातील डोंगरी व दुर्गम भागामध्ये असणाऱ्या खुंदलापूर,गुढे ,पाचगणी, मानेवाडी येथे करावा .जेणेकरून या ठिकाणीचे जीवनमान उंचावण्यास मदत होईल.यावेळी आमदार सत्यजित देशमुख यांनी विधिमंडळात केल्या मागण्याबाबत शासन सकारात्मक निर्णय घेईल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
0 Comments