शिराळा:वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये मिळणाऱ्या ज्ञानाचा व प्रशिक्षणाचा फायदा करून शेतकऱ्यांना ऊस शेतीमधील जास्तीचे उत्पादन घेवून आर्थीक फायदा करून घ्यावा, असे प्रतिपादन विराज उद्योग समुहाचे अध्यक्ष, व विश्वास कारखान्याचे संचालक विराज नाईक यांनी केले.
चिखली (ता. शिराळा) येथील विश्वासराव नाईक सहकारी साखर कारखान्यातर्फे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (पुणे) येथे "ज्ञानयाग" या ऊस शेती प्रशिक्षणासाठी कारखाना कार्यक्षेत्रातील चौदा शेतकरी रवाना झाले. यावेळी कार्यकारी संचालक अमोल पाटील व शेती अधिकारी ए. ए. पाटील प्रमुख उपस्थित होते.
संचालक श्री. नाईक म्हणाले, ऊस शेतीमधील शास्त्रीय ज्ञान मिळण्याच्या दृष्टीने शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येते. निवासी प्रशिक्षणामध्ये ऊस पिकाबद्दल संपूर्ण ज्ञान देण्याचे काम केले जाते. आतापर्यंत प्रशिक्षणातील सर्व बाबींचा शेतकऱ्यांनी वापर केल्यास उत्पन्नामध्ये वाढ झाल्याचे दिसून आले आहे. शेतकऱ्यांनी पारंपरिक ऊस शेतीमध्ये बदल करून आधुनिक ऊस वाढीचे तंत्रज्ञान स्वीकारले पाहिजे, ही काळाची गरज आहे.
प्रारंभी शेतकऱ्यांना घेऊन जाणाऱ्या गाडीचे पूजन संचालक श्री. नाईक यांच्या हस्ते झाले. त्यांनी प्रशिक्षणासाठी निघालेले शेतकरी आनंदराव शिराळकर, राजाराम धस, पंडित निकम, संपत पाटील, शंकर पाटील, वसंत साळुंखे, विश्वास पायमल, संभाजी पाटील, बाबासो पाटील, दीपक शेटे, प्रकाश नांगरे, गोरक्ष पवार, तुकाराम चौगुले, ओमकार निकम यांना शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी उप ऊस विकास अधिकारी संदीप पाटील यांच्यासह शेती विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
0 Comments