शिराळा ,ता.२१: तुमच्या मनासारखी नागपंचमी साजरी होण्यासाठी नक्कीचं प्रयत्न चालू आहेत. आपल्याला त्यात यश मिळेल अशी आशा आहे.परंतु उच्च न्यायालयाच्या असलेल्या निर्देशनुसार शिराळकरांनी संयम बाळगून हा उत्सव साजरा करावा,उत्सवाची सर्व माहिती मिळण्यासाठी तहसील कार्यालयात वॉर रुम तयार करा असे प्रतिपादन आमदार सत्यजित देशमुख यांनी केले.
शिराळा येथील तहसीलदार कार्यालयाच्या सभागृहात प्रशासनाच्यावतीने नागपंचमीच्या पार्श्वभूमीवर आयोजित बैठकीत बोलत होते.यावेळी प्रांताधिकारी श्रीनिवास अर्जुन, तहसीलदार शामला खोत- पाटील, पोलिस निरीक्षक सिद्धेश्वर जंगम, नायब तहसीलदार राजेंद्र शिद, यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी आमदार देशमुख म्हणाले,नागपंचमी उत्सव हा कायद्याच्या कचाट्यात आहे. त्याबाबतीत वरिष्ठ पातळीवर हालचाली सुरू आहेत. त्याचीही माहिती लवकरच आपल्याला मिळेल. प्रशासनाने अतिशय काळजीपूर्वक काटेकोर नियोजन करावे. महावितरणने २८ ते ३० जुलै पर्यंत अखंडित वीजपुरवठा करावा. यामध्ये कुठे अडचण आल्यास संबंधित अधिकाऱ्यांनी कारवाईला सामोरे जावे लागेल. आरोग्याच्या दृष्टीने आरोग्य विभागाने तातडीची सेवा द्यावी.नगरपंचायत ने औषध फवारणी, जागा वाटप, नाग मंडळ परवानगी, टॉयलेट व्हॅन, अग्निशमन यंत्रणा याची व्यवस्था करावी. नाग मंडळानी कायद्याचे पालन करून प्रशासनास सहकार्य करावे.
प्रांताधिकारी श्रीनिवास अर्जुन म्हणाले,उच्च न्यायालयाचे कठोर निर्देश असल्याने शिराळकरांनी नागपंचमी उत्सव संयमाने साजरा करावा. कोणताही अनुचित प्रकार प्रशासन सहन करणार नाही. केल्यास कडक कायदेशीर कारवाई केली जाईल.उत्सवाला गालबोट लागणार नाही याची काळजी घ्या.प्रशासनास सहकार्य करा. वाद्यांच्या आवाजाची मर्यादा राखून त्याचा त्रास यात्रेकरूंना आणि स्थानिक नागरिकांना होऊ नये याची काळजी घ्यावी.
तहसीलदार शामला खोत म्हणाल्या, कायदा हा सर्वश्रेष्ठ आहे. शिराळकर नक्कीचं त्याचा आदर राखतील हा विश्वास आहे. आपल्यामुळे यात्रेकरूंना कोणत्या ही प्रकारचा त्रास होऊ नये याची दक्षता घ्यावी.
यावेळी रणजितसिंह नाईक, सम्राटसिंह शिंदे,शिवसेना तालुका प्रमुख पृथ्वीसिंग नाईक, माजी नगरसेवक केदार नलवडे, माजी सरपंच प्रमोद नाईक,प्रा. सम्राट शिंदे, माजी सरपंच देवेंद्र पाटील,प्रताप पाटील, वसंत कांबळे, अजय जाधव, श्रेयस महाजन, सत्यजित कदम, वैभवी कुलकर्णी,अक्षय कदम,अविनाश खोत ,जयसिंग गायकवाड,तालुका आरोग्य अधिकारी डॉ. साकेत पाटील,उपजिल्हा रुग्णालय अधीक्षक डॉ.नूतनगौरी कणसे, टकेकर, उपविभागीय जलसंधारण अधिकारी प्रवीण तेली, एस.आर.साळुंखे, सर्व विभागाचे अधिकारी, शिराळा येथील नाग मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.
जगप्रसिद्ध शिराळा नागपंचमीसाठी प्रशासनाकडून नियोजन केले जाते.सध्या प्रशासनाकडून केवळ बैठकांचा फार्स चालू आहे.सहर्ष स्वागत करत आहात पण सुरक्षितता, स्वच्छता, सोयी सुविधा, पाणी हे मूलभूत प्रश्न उभा राहिले आहेत.दरवर्षी शिराळ्यातील अनुभवी व्यक्ती, लोकप्रतिनिधी यांना घेऊन संपूर्ण नियोजन केले जात होते.मात्र आता असे कोणतेच प्रयत्न दिसून येत नाहीत यातून मांढरदेवी सारखा एखादा अनर्थ घडल्यास प्रशासन जबाबदार असेल असे परखड मतॲड. प्रा सम्राट शिंदे यांच्यासह इतर सहकाऱ्यांनी या बैठकीत व्यक्त केले.
0 Comments