शिराळा,ता.३०:करुंगली (ता.शिराळा) येथील करुंगली-गुंडगेवाडी या दोन गावाला जोडणारा वारणा डावा कालव्यावरील धोकादायक पुल कोसळला.ही घटना आज दुपारी सव्वा एक वाजण्याच्या सुमारास घडली. यात कोणती ही जीवित हानी झाली नाही. या पुलाचे बांधकाम सुमारे चाळीस वर्षा पूर्वी झालेले आहे.
याबाबत घटनास्थळावरून समजलेली माहिती अशी,वारणा डावा कालव्यावर करुंगली येथे शेतकऱ्यांना ये-जा करण्यासाठी पुल बांधण्यात आला होता. काही दिवसा पासून त्या पुलाच्या मध्यभागी असलेला दगडी बांधकामाच्या पिलरचा काही भाग कोसळला होता. पुल धोकादायक झाल्याने तो वाहतुकीसाठी बंद केला होता. या पुलावरून शेतकरी शेतात जाण्यासाठी आपल्या जनावरांच्यासह ये -जा करत होते.आज दुपारी सव्वा एक वाजण्याच्या सुमारास हा पूल कोसळला.
त्या पूर्वी अर्धातास आधीच काही शेतकरी जनावरांना वैरण घेऊन त्या पुलावरून गेले होते.हा पुल कोसळतांना आजूबाजूला शेतात काम करणाऱ्या लोकांना मोठा आवाज आल्याने त्यांनी पाहिले असता पुल कोसळळेला दिसला.ही माहिती करुंगली व गुंडगेवाडी ग्रामस्थांना समजताच सरपंच आम्रपाली नांगरे, ग्रामसेवक जितेश शिंदे,पोलीस पाटील मनिषा कांबळे, ग्रामपंचायत सदस्य विठ्ठल पाटील,तानाजी पाटील,अशोक विभुते,सर्जेराव पाटील,निवृत्ती जाधव,निलेश तुपारे,बाळू माने,राहुल लोहार यांनी पाहणी केली.पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अधिकारी बी.आर.पाटील,शाखा अभियंता सुदाम कुंभार यांनी भेट देऊन पाहणी केली. त्या पुलाकडे जाणारा रस्ता मातीचा ढिगारा लावून बंद करण्यात आला आहे. हा पूल कोसळल्याने करुंगली येथील शेतकरी व गुंडगेवाडी येथील ग्रामस्थांचा जवळचा संपर्क तुटला आहे.
काखेत कळसा गावाला वळसा----
करुंगली येथील सुमारे पन्नासहून अधिक एकर शेती व डोंगराचे क्षेत्र कालव्याच्या पलीकडे आहे.त्यामुळे दररोज शेतातील कामांसाठी व जनावरांचा चरण्यासाठी जावे लागते.हा जवळचा मार्ग होता.गुंडगेवाडी येथील लोकांना करुंगली ग्रामपंचायत असल्याने कामा निमित्ताने दररोज याच मार्गे यावे लागते.हा पूल कोसळल्याने त्यांना पर्यायी दोन पुलाचा मार्ग आहे.परंतु त्यासाठी एक ते दीड किलोमीटर पायपीट करावी लागणार आहे.चिखलातून पावसाळ्यात चार चाकी वाहून जावू शकत नसल्याने दोन्ही गावांना करुंगली,आरळा,येसलेवाडी मार्गे चार किलोमीटरसाठी उलटा १२ किलोमीटर प्रवास करावा लागणार आहे.
पूल कोसळण्याची वेळ आणि पद्धत एकच
अडीच वर्षा पूर्वी फेब्रुवारी २० २३ मध्ये कुसळेवाडी येथील वारणा कालव्यावरील पूल कोसळला होता..कुसळेवाडी व करुंगली येथील दोन्ही पूल दुपारच्या वेळी आणि मध्यभागीच कोसळले आहेत.पूल कोसळण्याची वेळ आणि पद्धत एकच असल्याने हा एक योगायोगच आहे.
करुंगली येथील वारणा डावा कालव्यावरील पूल कोसळल्याने आम्ही त्या मार्गावर बॅरेकेत व मातीच्या ढिगारा लावून प्रतिबंधात्मक उपाययोजना केली आहे.
बी.आर.पाटील उपविभागीय अधिकारी पाटबंधारे विभाग
नशीब बलवत्तर
मोठ्या वाहनासाठी वाहतूक बंद होती.परंतु जवळचा मार्ग असल्याने आम्ही काही शेतकरी पूल कोसळण्या पूर्वीच जनावरांना वैरण घेवून याच पुलावरून आलो होतो.पूल कोसळल्याची माहिती मिळताच जीवात धसं झालं.आमचं नशीब बलवत्तर होतं.
(तानाजी पाटील शेतकरी )
0 Comments