शिराळा,ता.२:शिराळा नगरपंचायत निवडणुकीसाठी अत्यंत चुरशीने ८३.०८ टक्के अत्यंत शांततेत मतदान झाले.१३०९५ मतदार पैकी १०८७९ मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला.त्यामध्ये महिला मतदार ५३५९ तर पुरुष ५५१९ इतर १ यांचा समावेश आहे.सर्वाधिक मतदान प्रभाग १ मध्ये ९०.१० तर सर्वात कमी प्रभाग १० मध्ये ७४.३३ टक्के झाले आहे.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून शहरात १०० हून अधिक पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.दोन ठिकाणी किरकोळ बाचाबाची वगळता तणावपूर्ण वातावरणात पण शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली.
मॉक पोल दरम्यान प्रभाग ११ च्या मतदान केंद्र मधील एका मशीनचे बटण दबत नसल्याने ते त्वरित बदलण्यात आले.अनेक वयोवृद्ध मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला त्यामध्ये सरस्वती हरिभाऊ जाधव या १०३ वर्षांच्या आज्जीबाईचा सहभाग होता.बंदोबस्तासाठी पोलीस निरीक्षक१,सहाय्यक पोलीस निरीक्षक व पोलीस उपनिरीक्षक ४,पोलीस कर्मचारी ३६,होमगार्ड ५२ व राज्य राखीव पोलिस दलाचे १पथक अशी एकूण १०० पेक्षा जास्त मनुष्यबळाची नेमणूक करण्यात आली होती.शांततेत व सुरक्षित वातावरणात मतदान पार पडावे यासाठी प्रशासनाकडून तयारी पूर्ण करण्यात आली होती.प्रभाग क्र.४मधील नगरसेवक पदाची निवडणूक लांबणीवर पडल्याने तेथे नगराध्यक्षपदासाठी मतदान झाले.त्यामुळे नगरपंचायतीतील१७ ऐवजी १६ प्रभागांमध्ये १६ जागांसाठी मतदान प्रक्रिया पडली.प्रभागासाठी स्वतंत्रपणे प्रभावी व्यवस्था सुद्धा उभारण्यात आली होती.मतदानासाठी एकूण १७ मतदान केंद्रे होती.त्यासाठी १७ मतदान केंद्राध्यक्ष,५४ मतदान अधिकारी,१७शिपाई यांची नियुक्ती केली होती.त्याचबरोबर३ झोनल अधिकारी,२१राखीव अधिकारी अशा एकूण १२९शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांवर निवडणूक कामकाजाची जबाबदारी सोपविण्यात आली होती.मतदारांना कोणतीही अडचण निर्माण होऊ नये यासाठी मतदान केंद्रांवर स्वच्छता,पिण्याचे पाणी,वीज व्यवस्था,सावली,ज्येष्ठ व दिव्यांगांसाठी विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या.दरम्यान,मतदान केंद्रांना निवडणूक निरीक्षक किरण कुलकर्णी,पोलीस उपाधीक्षक अरुण पाटील,निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार शामला खोत-पाटील,सहायक निवडणूक निर्णय अधिकारी सुरज कांबळे,पोलीस निरीक्षक जंबाजी भोसले यांनी पाहणी केली.ऑस्ट्रेलियातून येऊन नव युवा मतदार अन्सार मुल्ला यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.एक जागृत मतदार म्हणून त्यांनी आपले कर्तव्य पार पडले आहे.ही बाब कौतुकास्पद आहे.त्यांचे निवडणूक निर्णय अधिकारी शामला खोत-पाटील यांनी मतदान केंद्रावर स्वागत केले.
प्रभाग निहाय एकूण मतदान व झालेले मतदान व कंसात टक्केवारी अशी-
१(६१६)-५५५(९०.१०),
२(७७७)-६७९(८७.३९),
३ (९८५)-७९१(८०.३०),
४(५५०)-४३९(७९.८२)फक्त नगराध्यक्षपदासाठी,
५(९९१)-८४२(८४.९६),
६(८८३)-७२७(८२.३३),
७(७३४)-६३३(८६.२४),
८(६८२)-६१३(८९.८८),
९(७२२)-५९२(८१.९९),
१०(९६६)-७१८(७४.३३) ११(६२१)-४७८(७६.९७),
१२(६९४)-५७८(८३.२९),
१३(६१८)-५०६(८१.८८),
१४(९४८)-७८७(८३.०२),
१५(८३५)-७०१ (८३.९५),
१६(७३८)-६०१(८१.४४)
१७(७३५)-६३९(८६.९४ ).
एकूण १३०९५-१०८७९(८३.०८)

0 Comments