शिराळा,ता.२२:चिखली (ता.शिराळा) येथील शेतकऱ्यांचा वारणा प्रकल्पाच्या डाव्या कालव्याचे ५३ ते ५५ किलोमीटर मधील खुदाईच्या कामास विरोध असून भूसंपादनाची रक्कम अथवा देय असणारे व्याज शासनाकडून प्रथम शेतकऱ्यांना द्यावे त्यानंतरच प्रकल्पाच्या कालव्याचे काम सुरू करावे अशी मागणी शेतकऱ्यांनी कोल्हापूर येथे झालेल्या बैठकीत केली.
सांगली जिल्हाधिकारी यांच्याकडे वारणा प्रकल्पपाच्या डाव्या कालव्याने बाधित झालेल्या चिखली येथील शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईच्या केलेल्या मागणीच्या अनुषंगाने अधीक्षक अभियंता कोल्हापूर पाटबंधारे मंडळ कोल्हापूर यांच्या उपस्थिती बैठक घेण्यात आली. यावेळी अभिजीत मेत्रे अधीक्षक अभियंता,माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक, वाळवा उपविभागीय अधिकारी श्रीनिवास अर्जुन,कार्यकारी अभियंता डी.डी.शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.
वारणा प्रकल्पाच्या डाव्या कालव्यासाठी गेले ४४ वर्षांपूर्वी शेतकऱ्यांच्या जमिनी शासनाकडे ताब्यात घेण्यात आल्या असून त्याची नुकसान भरपाईची रक्कम अनेक वेळा शेतकऱ्यांनी निवेदन देऊन त्याचबरोबर आंदोलन करून अध्याप न मिळाल्याने चिखली गावच्या २५० वर शेतकऱ्यांच्या वर अन्याय झाला आहे. या शेतकऱ्यांचे सुमारे ४० एकर जमिनीवर कालव्याची अर्धवट खुदाई करून काम प्रलंबित आहे.भूसंपादन कायद्यातील कलम ८० नुसार शेतकऱ्यांच्या जमिनी ताब्यात घेतल्यानंतर त्यांना भरपाई देणे शासनाकडून विलंब झाला.तर जमीन शासनाने ताब्यात घेतलेल्या दिनांक पासून या जमिनीतून शेतकऱ्यांना कोणते उत्पन्न घेता आलेले नाही.अशा परिस्थितीत भूसंपादन कायद्यातील तरतुदीनुसार त्यांना देय असणाऱ्या हक्काच्या रकमेबाबत पाटबंधारे विभाग कोणतीही ठोस अशी कार्यवाही करत नाही.त्यामुळे शेतकऱ्यांचा सदरचे काम सुरू करण्यास प्रचंड विरोध आहे. भूसंपादन झालेल्या जमिनीचा मोबदला प्रथम शेतकऱ्यांना द्यावा.नंतरच खुदाईचे काम सुरू करावे या मागणीसाठी संबंधित शेतकरी यांनी माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक यांच्या समवेत अधीक्षक अभियंता पाटबंधारे मंडळ कोल्हापूर तसेच उपविभागीय अधिकारी वाळवा इस्लामपूर यांचे समवेत झालेल्या बैठकीमध्ये आग्रहाणे मागणी केली.यावर अधीक्षक अभियंता पाटबंधारे मंडळ कोल्हापूर व उपविभागीय अधिकारी वाळवा इस्लामपूर यांनी सदरची मागणी कृष्णा खोरे विकास महामंडळाकडे तत्परतेने सादर करून त्यावर लवकरात लवकर निर्णय मिळणे कामी आम्ही प्रयत्न करत असल्याचे सांगितले.
यावेळी सहाय्यक अभियंता अनिल लांडगे,सहाय्यक अभियंता अनिकेत शिर्के,शिराळा कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती विजय महाडिक,माधवराव नाईक,निखिल साळुंखे,शशिकांत चौगुले,सागर साळुंखे,विश्वास गायकवाड उपस्थित होते.
0 Comments