ढेबेवाडी: गुढे- काळगाव रस्त्यावर वायचळवाडी (ता.पाटण) जवळमंगळावरी रात्री मृतावस्थेत आढळलेल्या महिलेची ओळख पटली आहे.कविता माणिक वारे (वय ४३, रा.भागाईवाडी, ता. शिराळा) असे मृत महिलेचे नाव आहे. पतीसमवेत घराकडे परतत असताना तळमावलेनजीक (ता.पाटण) अनोळखी मोटारीने धडक देऊन त्यांना सुमारे दीड किलोमीटरपर्यंत फरफटत नेल्याचा धक्कादायक प्रकार पोलिसांच्या तपासात समोर आला आहे. या अपघातात त्यांचे पती माणिक वारे (वय ४७) हेही जखमी झाले आहेत.
ढेबेवाडी येथील पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद झाली आहे.पोलिसांची माहिती अशी, गुढे -काळगाव रस्त्यावर वायचळवाडीजवळ मंगळवारी रात्री अज्ञात महिलेचा मृतदेह पडल्याचे निदर्शनास आले. नागरिकांनी त्याबावत येथील पोलिसाना कळवले. सहायक पोलिस निरीक्षक डॉ. प्रवीण दाईंगडे व त्यांच सहकारी तातडीने घटनास्थळावर पोहोचले. संबंधित महिलेला गंभीर दुखापत झाल्याचे दिसून आले. पोलिसानी महिलेबाबत माहिती काढल्यावर त्यांचे नाव कविता माणिक वारे (रा. भागाईवाडी, ता. शिराळा) असल्याचे स्पष्ट झाले. त्यांच्या समवेत असलेले त्यांचे पती माणिक वारे हे जखमी स्थितीत तळमावलेजवळच्या पेट्रोल पंपाजवळ नाल्यात सापडले.त्यामुळे धडक दिलेल्या वाहनाने कविता यांना अपघातस्थळापासून सुमारे दीड किलोमीटरपर्यंत फरफटत नेल्याची धक्कादायक बाब समोर आली.
माणिक यांच्यावर तळमावल्यातील दवाखान्यात उपचार करण्यात आले.वारे दांपत्य काही महिन्यांपूर्वी या परिसरात रोजगारासाठी आले होते. विभागातील गुढे येथे त्यांचे नातेवाईक आहेत. दोघे कऱ्हाडला कामानिमित्त गेले होते.रात्री तळमावले बसथांब्यावर उतरून घराकडे जात असताना हा अपघात झाला. अपघातस्थळी पोलिसांना मोटारीची तुटून पडलेली नंबरप्लेटही आढळली आहे. त्यावरून तसेच सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांचा तपास सुरू आहे. लवकरच अपघातग्रस्त वाहन व चालकापर्यंत पोहोचू, असा विश्वास सहाय्यक निरीक्षक डॉ. दाईंगडे यांनी व्यक्त केला. दरम्यान, कविता यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीनंतर नातेवाइकांच्या ताब्यात देऊन मूळगावी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.त्यांच्या मागे पती, दोन मुले, मुलगी असा परिवार आहे.
0 Comments